बेळगाव : कोल्हापूर दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी शनिवारी (दि. २०) निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने सीमावासीयांना ‘चलो कोल्हापूर’ची हाक दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यात यावा. मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा आणि घटनात्मक अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात येणार आहे. कोल्हापुरात शनिवारी ही भेट होणार असून, मराठी भाषिकांनी कोल्हापूरच्या सभेसाठी मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये मंत्री शहा जाहीर सभा घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ही सभा पोलिस परेड मैदानावर होणार असून, या सभेत सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या सभेवेळी मंत्री शहा यांना भेटून सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा, सीमाभागातील अन्याय दूर करण्यात यावे, आसाम-मेघालयप्रमाणे या प्रश्नाची तड लावण्याचा प्रयत्न करावा, दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची समिती स्थापन करून सीमाभागातील कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
सभेसाठी म. ए. समिती कार्यकर्त्यांनी सकाळी ९.३० वाजता शिवाजी विद्यापीठासमोर एकत्र जमावे. तेथून सर्वांनी मिळून सभास्थळी जाण्यात येणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.