CM Devendra Fadnavis pudhari photo
बेळगाव

Belgaum border dispute: सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक उद्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ३४ मान्यवर उपस्थित राहणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात आगामी काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार असल्यामुळे बुधवारी (दि. ८) मुंबई येथील विधान भवनात दुपारी दीड वाजता उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी, विरोधी गट, तज्ज्ञ आणि मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना मिळावी. त्यासंदर्भात वकिल आणि तज्ज्ञांशी चर्चा व्हावी, न्यायालयीन लढ्याची रणनिती आखावी आदी मागण्यांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने सरकारकडे उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी, यासाठी पाठपुरावा करत आली आहे.

त्यानुसार सुरवातीला ३० जूनरोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, प्रशासकीय कारणांमुळे ही बैठक लांबणीवर पडली होती. आता बैठकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून ८ जुलैरोजी विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात दुपारी १.३० वाजता ही बैठक होणार आहे.

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे, समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई, तज्ज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने, सदस्य दै. पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडीक यांच्यासह मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींसह ३४ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सीमावासीयांचे या बैठकीकडे लक्ष लागून आहे. तर कन्नड संघटनाही या बैठकीत काय होणार, यावर आपली रणनिती ठरविणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT