बेळगाव : शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपतर्फे शेतकरी बांधवांच्या सहकार्याने मंगळवारी (दि. 9) हिवाळी अधिवेशनादरम्यान सुवर्णसौधला घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार पाटील म्हणाले, येत्या 8 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरवर्षी सरकारकडून बेळगावमध्ये आयोजित केले जाणारे हे हिवाळी अधिवेशन म्हणजे मौजमजेसाठी गोव्याची सहल अशी लोकांची भावना होऊ लागली आहे. उत्तर कर्नाटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशी भावना ठेवून सरकारने काम करावे आणि या प्रदेशाचा सर्वांगीण विकास साधावा, अशी मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते सरकार समोर ठेवत आहोत. उत्तर कर्नाटकातील शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे त्यावरून सरकार शेतकऱ्यांना मानसन्मान देत नसल्याचे, त्यांची काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जनता, शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टींऐवजी मुख्यमंत्री पद, मेजवान्या यासंदर्भातील बातम्या टीव्हीवर सतत झळकत आहेत.
शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्याविरोधात येत्या मंगळवारी 9 रोजी भारतीय जनता पक्षातर्फे शेतकरी संघटनांच्या सहकार्याने भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांकडून सुवर्ण विधानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाजवळील मालिनी सिटी येथून मंगळवारी सकाळी 10 वाजता भव्य मोर्चाने जाऊन राज्याध्यक्ष विजयेंद्र आणि जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदारांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण विधानसौधला घेराव घातला जाईल. बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले. माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, एम. बी. जिरली, माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते.