बेळगाव

Belgaum News : बिम्समध्ये लाखोंच्या मुदत संपलेल्या लसी

उपलोकायुक्तांची अचानक भेट : औषधसाठ्याच्या व्यवस्थापनावर नाराजी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या (बिम्स) औषध गोदामात रेबीजसह विविध आजारांवरील लाखो रुपयांच्या मुदत संपलेल्या लसी आढळून आल्याने उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) त्यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. औषधे आणि लसींच्या साठवणुकीत निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासह दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

न्या. वीरप्पा यांनी बाह्यरुग्ण नोंदणी विभाग, औषध वितरण केंद्र, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन विभागाची पाहणी केली. नोंदणी प्रक्रिया, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी औषध गोदामात मुदत संपलेल्या लसींचा मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. औषधे आणि लसींच्या मुदत समाप्तीच्या तारखा नियमितपणे तपासाव्यात. मुदत संपलेली औषधे रुग्णांच्या वापरात येणार नाहीत, यासाठी काटेकोर खबरदारी घ्यावी. साठवणूक आणि वितरण व्यवस्थेत त्रुटी असल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालयातील औषध वितरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि रुग्णांना औषधे मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा लक्षात घेऊन वितरण केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे बाहेरुन खरेदी करण्यास रुग्णांना सांगितले जाणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडे पैशांची मागणी होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचारांची गुणवत्ता आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली. रक्तपेढीला भेट देऊन रक्तसाठ्याची पाहणी केली. यावेळी उपनिबंधक अरविंद, लोकायुक्त जिल्हा पोलिसप्रमुख प्रसन्न देसाई, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव न्या. के. एन. शिवकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, डॉ. विनय दास्तिकोप्प, जिल्हा आरोग्याअधिकारी डॉ. आय. पी. गडाद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT