Bank Employees Strike 
बेळगाव

Bank Employees Strike : तीन दिवसांचा संप; पाच दिवस गैरसोय

बँक कर्मचारी २८ पासून संपावर; चौथा शनिवार व रविवारमुळे सेवा विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पाच दिवसांचा कामाचा आठवडा, पेन्शन सुधारणा आणि अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (युएफबीयु) २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. केंद्रीय कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत झालेली वाटाघाटीची बैठक निष्फळ ठरल्याने संपाचा निर्णय कायम राहिला आहे. मात्र, बँक कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार असले तरी चौथा शनिवार व रविवारमुळे बँक सेवा तब्बल पाच दिवस ठप्प राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर रोजी संपावर जाणार आहेत. तत्पूर्वी, २६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि २७ रोजी रविवार आहे. यामुळे बँकिंग सेवा २६ ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. सलग पाच दिवस बँकिंग सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरला सहामाही हिशेब असतो. या व्यवहारांवरही संपाचा परिणाम शक्य आहे. ग्राहकांना या काळात मोठे व्यवहार करता येणार नसून बँकिग सेवेसाठी एटीएम, नेट बँकिंग व युपीआयवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे संप होऊ नये अशी ग्राहकांची अपेक्षा असून सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

संपाच्या काळात एटीएम, यूपीआय, इंटरनेट व मोबाइल बँकिंग, बँकांची मोबाईल ॲप्स, कस्टमर सर्व्हिस पॉइंट आदी डिजिटल सेवा सुरु ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. मात्र शाखेत रोख रक्कम जमा करणे, रक्कम काढणे, धनादेश प्रक्रिया, केवायसी, खाते विषयक कर्मचारी सेवा, डीडी तसेच अन्य शाखा-आधारित सेवांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीने ग्राहकांना संपापूर्वी आवश्यक रोख व्यवहार, पैसे जमा करणे, निधी हस्तांतरण, बिले भरणे, कर्जाचे हप्ते आणि अन्य अत्यावश्यक व्यवहार पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

मागण्या काय?

संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण होत नसल्याने संपाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शनिवारी सुट्टी, निवृत्ती वेतनधारकांसाठी समान महागाई भत्ता सूत्र, एनपीएसअंतर्गत कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय, प्रलंबित सेवा व वेतन विषयक प्रश्न सोडविण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT