बेळगाव : संदर्भ सापडत नसलेल्या मतदारांच्या नावांची पुन्हा एकदा पडताळणी करा, असे पत्र आपण निवडणूक आयोगाला दिलेले आहे. नावे डिलीट करण्यासाठी नाही, असा पुनरुच्चार बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला. तसेच बेळगावात बांगलादेशी व रोहिंग्या मतदार असल्याचा दावा करताना त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवायची का, असा प्रश्नही त्यांनी केला. एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि. २) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, काँग्रेस सरकारला मनमानी पद्धतीने पूर्वीचीच मतदार यादी हवी आहे. आपल्या चुका झाकण्यासाठी ते भाजपवर आरोप करीत आहेत. बी. के. हरिप्रसाद यांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलेले असताना आता मुख्यमंत्रीही खोट्यांचे सरदार होऊन तीच भाषा वापरत आहेत. भाजपकडून नावे डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे मुख्यमंत्री शिवकुमार सांगत आहेत. सरकार तुमचे, एसआयआर करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी तुमचे मग आम्ही दबाव कसा आणत आहोत, असा प्रश्न त्यांनी केला.
बीएलओ, बीएलए-२ यांनी तळापासून चौकशी करु नये, यासाठी मुख्यमंत्रीच दबाव आणत आहेत. तर अधिकारी मतदारांची पडताळणी कशी करणार? मी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बीएलए-२ ने दिलेल्या पत्रानुसार पडताळणी व्हावी, असे म्हटले आहे, नावे डिलीट करा असे कुठेही म्हटलेले नाही. असे असताना मुख्यमंत्री व अन्य मंत्रीही जनतेची दिशाभूल करत आहेत. एखाद्याचे नाव डिलीट झाले तर तो रस्त्यावर का येत नाही. जे मृत पावले आहेत, डबल नावे आहेत चोर आहेत त्यांचीच नावे यादीतून डिलीट झाल्याने ते चिडीचूप असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला. यावेळी माजी खासदार इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार आदी उपस्थित होते.
८० टक्के बीएलओ मुस्लिम : बेनके
बेळगाव उत्तर मतदारसंघात घडलेल्या घटनेची माहिती देताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, आम्ही एक यादी बीएलओंना पडताळणीसाठी दिली होती. परंतु, काहीनी एकत्र येऊन ती यादी घेऊ नये, यासाठी दबाव आणला. इतकेच नव्हे तर डॉ. रवी पाटील यांच्यासह अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात ८० टक्के बीएलओ मुस्लिम असल्याने संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराची योग्य पडताळणी व्हावी, ही आमची मागणी चुकीची कशी? बेळगावात यापूर्वी अनेकदा बांगलादेशी व रोहिंग्या सापडलेले आहेत. असे आणखी बांगलादेशी व रोहिंग्या मतदार नाहीत, हे या यादीच्या पडताळणीवरुन स्पष्ट होणार आहे. परंतु, पडताळणीलाच विरोध होऊन काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ॲड. बेनके यांनी केला.