Hippargi Dam 
बेळगाव

Hippargi Dam : हिप्‍परगी धरणातील पाणी उपशावर बंदी

कृष्‍णाकाठावर पाणी समस्‍या बनली गंभीर : पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच

पुढारी वृत्तसेवा

सबरगी : महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असून सांगली शहरांमध्ये कृष्णा नदी कोरडी पडली आहे. कर्नाटकात जाणार्‍या पाण्याचा विसर्ग बंद झाल्यामुळे यावर्षी कृष्णाकाठ परिसरामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्‍यातच हिप्‍परगी धरणातील पाणी उपसा करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे. विद्युत पुरवठा खंडित केला जात असून पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच केला जाणार आहे.

ऑक्‍टोबर महिन्‍यात हिप्परगी धरणामध्ये पाण्याची पातळी चार टीएमसीवर आली आहे. त्यामुळे पाणी धरणाच्या बाहेर फक्त पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. पावसाळा संपला असून उवरित सात महिने पाणी कसे वापरावे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यंदा पावसाळ्‍यात पुरेसा पाणी साठा नसल्‍याने गंभीर समस्या आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. सर्रास गावांमध्ये भविष्यात पाण्याची टँकर सुरू करण्याचा प्रसंग येणार आहे. पावसाचे प्रमाण फारच कमी राहिल्‍याने आणि कोयना धरणामध्ये पाण्याचा साठा ८० टीएमसी वर आला आहे. महाराष्‍ट्रातुन कर्नाटकात पाणी सोडण्याचे बंद करण्यात आल्‍याने लवकरच पाणी समस्‍या गंभीर बनणार आहे.

कृष्‍णाकाठावरील ३५० गावांना हिप्‍परगी धरणाचे पाणी येत्‍या जूनपर्यंत पुरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर कर्नाटक सरकारने बंद केले आहे. आठवड्यातून दोन दिवस वीज पुरवठा खंडित केला जात होता. आता आणखी दोन दिवस वाढवल्‍याने एकूण चार दिवस सिंगल फेज वीज पुरवठा केला जाणार आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये सध्या कृष्णा नदी कोरडी पडली आहे. कर्नाटकात येणारा पाण्‍याचा विसर्ग बंद झाल्याने जेमतेम पाण्यावरच राहण्याचा प्रसंग कृष्णा काठावरील गावांना आला आहे. कर्नाटकाला कृष्णा नदीला पाणी कुठून सोडणार असा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यामध्ये पाणी समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड देण्याचा प्रसंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या सर्वच पाणी योजनेचे कालवे बंद करण्यात आले आहे.

सध्या धरणातील पाण्‍याचा पिण्यासाठीच वापर केला जात आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा प्रशासनाने खंडित केला आहे. सध्या धरणात चार टीएमसी पाणी आहे. येत्‍या काळाचा विचार करता शासनच यावर तोडगा काढू शकते.
- प्रवीण होनसीकट्टी, पाणीपुरवठा अधिकारी, हिप्परगी धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT