बेळगाव : मोबाईल ॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करणे व टॉवरच्या आमिषाला बळी पडणे अथणीतील दोन शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. एकाची २.९९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून दुसऱ्याकडून १.०४ लाख रुपये लाटण्यात आले आहेत.
मोबाईल लिंकवर क्लिक केल्यानंतर एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपये परस्पर लंपास करण्यात आले. याप्रकरणी बसवराज भीमप्पा नायक (वय ४४, रा. आवरखोड, ता. अथणी) यांनी बेळगाव सीईएन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० सप्टेंबर रोजी नायक हे ऑनलाईन व्यवहारासाठी वापरत असलेल्या ॲॅपवर पाहणी करत असताना त्यांना एक लिंक दिसली. त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर वारंवार ओटीपीचे संदेश येऊ लागले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन खात्याची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपये परस्पर लांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा सीईएन पोलिसांकडून तपास सुरू आहे. कोणत्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली आणि लिंकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
टॉवरच्या आमिषाने लाखाचा गंडा
मालकीच्या जमिनीवर बीएसएनएलचा टॉवर उभारण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची १ लाख ४ हजार ७०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार कोडगनूरमध्ये (ता. अथणी) उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब रामू हरगे (वय ३३, रा. कोडगनूर) यांनी अथणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने विविध मोबाईल क्रमांकांवरून हरगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या जमिनीवर बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात येणार असून त्यासाठी दरमहा ५० हजार रुपये भाडे आणि दहा वर्षांच्या करारासाठी ६० लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर संशयिताने एसबीआय खात्यात ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे सांगून हरगे यांच्याकडून एकूण १ लाख ४ हजार ७०० रुपये घेतले. १९ सप्टेंबर रोजी संशयिताने पुन्हा फोन करून आणखी ६० हजार रुपये जमा केल्यास हरगे यांच्या बँक खात्यात ३० लाख रुपये जमा होतील, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.