निपाणी : विधानसभा निवडणुकीला सुमारे दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना निपाणी विधानसभा मतदारसंघात आ. शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी माजी खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत यावेळी चौकार मारला जाईल, अशी घोषणा केली.
कितीही विरोधक आडवे आले तरी आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेनंतर एकसंबा येथे बिरेश्वर भवनचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी होणार होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहा यांचा दौरा रद्द झाला. सुमारे २० ते २५ हजार नागरिक चिकोडी लोकसभा मतदारसंघातून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातून जोल्ले यांनी शक्तिप्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कर्नाटक भाजप प्रदेश अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभा विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलूवराय स्वामी, खासदार धनंजय महाडिक, खासदार अजित गोपछडे यांच्यासह आमदार व मान्यवरांची उपस्थिती होती. तसे पाहता जोल्ले यांच्याकडून प्रत्येक महिन्यात काही ना काही कार्यक्रम होतच असतात. निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने त्यांनी एकसंबा येथे कार्यकर्त्यांचे निवासी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे व निपाणी विधानसभा मतदारसंघात झालेली कामे यांचा आढावा घेऊन बूथ पातळीवर भाजप संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न जोल्ले यांनी केला आहे.
राज्य सरकारने नुकताच ग्राम पंचायतचे आरक्षण जाहीर केले आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघात २७ ग्राम पंचायती आहेत. मागील निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटे की टक्कर झाली होती. आगामी निवडणूकही चुरशीची होणार आहे. लवकरच जिल्हा व तालुका पंचायतीचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे निपाणी विधानसभा मतदारसंघात शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने चिकोडी लोकसभा विभागाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा लक्ष्मण चिंगळे यांची निवड केली आहे.
माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. चिंगळे हे काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देणार का, पक्षाला उभारी मिळवून देण्याचे आव्हान ते कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवानेते उत्तम पाटील यांनी महिनाभरात दोनवेळा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यांचा पक्षप्रवेश केव्हा होणार, याची चर्चा होत आहे. त्यांची चाल काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.