बेळगाव

Belgaum News : अतिक्रमण हटाव मोहीम हिंसक वळणावर

अभियंत्यावर हल्ला, जेसीबीवर दगडफेक; शहापूरमधील तिघा व्यापाऱ्यांना अटक, मोहिमेविरुद्ध मंगळवारी मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला शहापूरमध्ये व्यापाऱ्यांनी विरोध करताना जेसीबीवर दगडफेक केल्याने या मोहिमेला हिंसक वळण लागले आहे. व्यापाऱ्यांनी मनपा अभियंत्याला धक्काबुक्कीही केली. या हल्ल्याबद्दल तीन व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली असून, आणखी हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

सुमारे ४० जणांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केला असून, पोलिस चौकशी सुरु आहे. साहित्य हलवण्याची नोटिस न देता जेसीबीने तोडफोड करण्यात आली, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. तर न्यायलयीन आदेशानुसार कारवाई होत असल्याने नोटिशीची गरज नाही, असे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याविरुद्ध मंगळवारी मनपावर मोर्चा नेण्याचा निर्णय शहापूर-खासबाग रस्ते व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी शहापूरला गेलेल्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्यापारी आणि स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. शनिवरी प्रकरण पोलिसांत गेले असून शनिवारी (दि. २४) तिघा हल्लेखोरांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शहापूर बॅ. नाथ पै चौक ते बसवेश्वर चौकापर्यंत रस्त्याशेजारी स्क्रॅप व इतर साहित्याच्या दुकानदारांकडून अतिक्रमण झाल्याची तक्रार याआधी करण्यात आली होती. त्यावर मनपाच्या अधीक्षक अभियंच्या लक्ष्मी निपाणीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अतिक्रमण काढून घ्या, असे सांगितले होते. शुक्रवारी संध्याकाळी अभियंते अंकित आर. हे जेसीबी घेऊन दाखल झाले. त्यांनी अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यास सुरवात केली. कारवाईमुळे व्यापारी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला. जेसीबीला घेराव घालून अभियंता अंकित व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काहींनी जेसीबीची काच फोडली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. हल्ल्यात अभियंता अंकित एम. आणि जेसीबी चालक आनंद कोलकार जखमी झाले.

परस्परविरोधी बाजू

आम्हाला नोटीस न देता, कशाच्या आधारावर कारवाई करण्यात येत आहे, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला होता. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र अतिक्रमण हटविण्यासाठी जोर लावला. त्यामुळे वादावादी आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आयुक्त कार्तिक एम. आणि अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी कर्मचाऱ्यांना धीर दिला.

नगरसेवक रवी साळुंखे आणि रवी धोत्रे तसेच काही स्थानिकांनी घटनास्थळीच मध्यस्थीद्वारे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निपाणीकर यांनी, अतिक्रमण हटवण्याची मोहीम न्यायालयाच्या आदेशानुसार राबवली जात असल्याचे सांगत न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप असल्यास संबंधितांनी न्यायालयात दाद मागावी. कर्तव्यात अडथळा आणणाऱ्या आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले.

गुन्हा दाखल, तिघांना अटक

हल्ल्याबद्दल शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. शनिवारी पोलिसांनी तिघांना अटक केली. सैफुल्ला अब्दुलरौफ फतेखान (वय ३०)तौसिफअहंमद महबूबसाब पटेल (वय ४४) व सीम्रान जहीर मुल्ला (वय ३०, तिघेही रा. नवी गल्ली, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत.  

महापालिका अभियंत्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शनिवारी शहापूर ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमाणी यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. प्रकरण आता पोलिसांत पोचले असल्यामुळे आगामी दिवसांत महापालिका सभागृह आणि बाहेरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

मोहिमेवर याआधीही आक्षेप

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर याआधीही आक्षेप घेण्यात आले आहेत. अनगोळ, टिळकवाडीत अतिक्रमण हटविताना व्यापाऱ्यांना पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोप होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT