बेळगाव ः मराठी माणसांवर दबाव घालण्यासाठी आता अंगणवाडी शिक्षिकांकडूनही प्रयत्न होत आहे. ताई (आई) कार्डसाठी फेस रीडींग करताना पालक मराठीतून बोलल्याने त्याच्यावर दादागिरी करत फक्त कन्नडमध्येच बोला, असा दबाव घालून दादागिरी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील रेल्वे लाईनजवळील एका गल्लीत अंगणवाडीत ताई कार्डसाठी पालकांचे फेस रीडींग करण्यात येत होते. त्यासाठी सोमवारी (दि. 9) अंतिम तारीख होती. पण, गल्लीतील एक पालक कामानिमित्त बाहेर गेला होता. या अंगणवाडीत मदतीसाठी दुसर्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकाही आली होती. पालक बाहेर असल्यामुळे त्यांना फोनवर संपर्क साधला. पण, दुसर्या कामात व्यस्त असल्यामुळे मी वेळेवर येऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेने व्हिडिओ कॉलवर फेस रीडिंग करुया, असे सांगितले.
त्यासाठी दुसर्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेच्या फोनवरुन व्हिडिओ कॉल करुन त्यांचे फेस रीडींग करण्याचे ठरले. त्यानुसार त्या शिक्षिकेने व्हिडिओ कॉल केला.त्यावेळी सदर पालकाने बोला मॅडम असे मराठीतून विचारले. त्यावेळी मराठीद्वेष्ट्या अंगणवाडी शिक्षिकेचा पारा चढला. त्यांनी तुम्हाला मराठी बोलता येणार नाही. तुम्हाला कन्नडमध्येच बोलावे लागेल, असे सांगत दादागिरी सुरु केली. कन्नड बोलण्यासाठी दबाव घालण्यात आला. महिला असल्यामुळे सदर पालकाने वाद न घालता फोन ठेवून दिला.
काही वेळानंतर पालकाने त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेला फोन करुन सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. पण, प्रशासकीय अधिकार्यांप्रमाणेच आता अंगणवाडी शिक्षिकेनेही मराठी भाषिकांवर दबाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांच्या विश्वासावर मराठी पालक आपली मुले अंगणवाडी शिक्षिकांवर सोपवत असतात. त्याच ठिकाणी असा भाषिक द्वेष उफाळून येत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर कन्नडसक्ती करण्यात येत असते. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवले जात असतात. आता शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कानडीकरणाचा सपाटा लावत मराठी लोकांवर दादागिरी होत आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.