बेळगाव : एअरलाईनमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपली १ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद एका तरुणीने खडेबाजार पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किर्लोस्कर रोडवरील फ्लाय विमान एव्हिएशन अॅकॅडमीचे अध्यक्ष शैलेंद्र लाथोर सिंग, त्याची पत्नी रेश्मा शैलेंद्र सिंग व कंपनीची व्यवस्थापिका श्रृती या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी सुजल फकीराप्पा मिसाळे (वय २०, रा. होसगेरी गल्ली, सुळेभावी, ता. बेळगाव) या तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे की, मे २०२५ मध्ये एका महिलेने मला फोन केला. आपली फ्लाय विमान एव्हिएशन ॲकॅडमी नावाची कंपनी आहे. येथे तुम्ही वर्षाचा कोर्स केल्यास तुम्हाला देशातील विविध विमानतळांमध्ये केबिन क्रू, पायलट, ग्राऊंड स्टाफ अशी नोकरी मिळते.
याठिकाणी तुम्हाला सुरवातीला ४५ ते ८० हजार रुपये इतका पगार मिळेल, असे आश्वासन दिले. यासाठी नोंदणी फी ५ हजार व नंतरची फी एक लाख असल्याचे सांगितले. मी येथे प्रवेश घेतला असता चार महिन्यांनी बंगळूर व अन्य ठिकाणी चार महिने प्रशिक्षणासाठी म्हणून पाठवत तेथेही वेळोवेळी रक्कम वसूल केली. सदर रक्कम सुमारे १ लाख ५१ हजार २४० रुपये इतकी होते.
यानंतर हैदराबाद येथील विमानतळावर सिक्युरिटीची नोकरी लावली. येथे १८ हजार रूपये पगार असल्याने मी दोन महिन्यात ती नोकरी सोडून बेळगावात आले. तुम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही, अशी विचारणा केली असता तोपर्यंत ती नोकरी करा, पुढे दुसरी नोकरी बघू, असे म्हणत संबंधितांनी उडवून लावले.
चांगली नोकरी लावण्याच्या आमिषाने माझी फसवणूक झाल्याचे सुजलने म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला आहे. पोलिस निरीक्षक महांतेश धामण्णावर तपास करीत आहेत.