खडकलाट : येथील अक्काचंद गुजर यांच्या शेतामध्ये 7 व 8 मार्च 1934 मध्ये दोन दिवस महात्मा गांधी यांनी नवलिहाळ येथे मुक्काम केला होता. याठिकाणी महात्मा गांधींचे स्मारक उभारण्याच्या मागणीचे वृत्त 2 ऑक्टोबर रोजी ‘पुढारी’मधून प्रसिध्द करण्यात आले. त्याची दखल घेऊन चिकोडीचे तहसीलदार व संबंधित अधिकार्यांनी अक्काचंद गुजर यांच्या शेतात येऊन महात्मा गांधी जयंती साजरी केली.
महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जयंती साजरी करण्यात येत नव्हती. मात्र गुरुवारी (दि.2) तहसीलदार राजशेखर बुर्ली यांनी स्वतः नवलीहाळ गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रा. पं. अध्यक्षांना सूचना करून आपण जिल्हाधिकार्यांकडे रस्ता, घर दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकार्यांना प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. निम सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ धुमाळ यांनी महात्मा गांधी यांच्या नवलिहाळ दौर्याबाबत पुस्तक लिहिले असून या पुस्तकाची प्रत तहसीलदारांना भेट दिली.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सचिन हुकेरी, उपाध्यक्षा कविता मोटनावर, निम सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ धुमाळ, राहूल मेहता, सविता कडगांवे, मारुती कवलापुरे, सचिन सनदी, बाबगोंडा जयापगोळ, मनोहर वाघमोडे, ग्रामविकासाधिकारी शिवानंद गुडनवर, कार्यदर्शी रवी चौगुले, तलाठी आरती कमते, रमेश हेगडे, जयरामजीराव घोरपडे, शिवगौडा पाटील, गिरगौडा पाटील, काकासाहेब खड्ड, रमेश कडगावे, श्यामगौडा हुवन्नावार, अॅड. प्रवीण हुवन्नावर, अण्णाप्पा कुंभार आदी उपस्थित होते.
आ. प्रकाश हुक्केरी यांच्याकडूनही दखल
आ. प्रकाश हुक्केरी यांनी ‘ पुढारी’मधील वृत्त वाचून तातडीने ग्रा. पं. अध्यक्ष सचिन हुकेरी यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याठिकाणी स्वच्छता करावी. शेताकडे जाण्यासाठी रस्ता निर्मितीसाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ. केंद्र सरकारकडून गांधींचे स्मारक उभे करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली जाईल, असे सांगितले.