बेळगाव : मारुतीनगरमध्ये मोकाट कुत्र्याने बालिकेचे लचके तोडल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. शहरातील सर्व मांसविक्री करणाऱ्या दुकानांना नोटीस पाठविली असून टाकाऊ मांस रस्त्यात टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी (दि. 10) एका नोटीशीद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील मांस विक्री दुकानदार टाकाऊ मांस अयोग्यरित्या रस्त्यात टाकत आहेत. रक्त, हाडे आणि मांसाचे अवशेष रस्त्याच्या कडेला आणि उघड्या ठिकाणी फेकले जात आहेत, असे आढळून आले आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून चाव्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे, शहरातील सर्व मांस विक्रेते, पोल्ट्री व्यापारी आणि मांस वाहतूकदारांना सार्वजनिक ठिकाणी, गटारींमध्ये किंवा मोकळ्या जागेत टाकाऊ मांस व अन्य अवशेष फेकण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर केएमसी कायदा अंतर्गत कारवाई केली जाईल.
सर्व प्रकारचे टाकाऊ मांस योग्यरित्या जमा करुन ते महापालिकेच्या कचरावाहू वाहनाकडे सुपूर्द केले पाहिजे. मांस वाहतूक करण्यासाठी फक्त बंद, गळती-प्रतिरोधक वाहने वापरावीत. मांसाच्या वासाने मोकाट कुत्र्यांना आकर्षित करणारी कोणतीही व्यवस्था नसावी. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द करण्याची आणि दुकान बंद करण्यासह दंड आकारण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शुभा बी. यांनी दिला आहे.