चिकोडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खोल जागेत घसरून झुडपात आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील कब्बूर टोल नाक्याजवळ घडली. या अपघातात शीला श्रीपती घाटे (वय ६५) व राजेंद्र शंकर पाटील (वय ४९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहन घाटे व प्रदीप घाटे (सर्व रा. मालिकवाड, ता. चिकोडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटे कुटुंबीय कारमधून मलिकवाड येथून घटप्रभाकडे जात होते. दरम्यान, निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील कब्बूर टोल नाक्याजवळ आल्यानंतर चालक राजेंद्र पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल जागेत घसरून उलटली आणि पुढे जाऊन झुडपाला जाउन धडकली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. चिकोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे मलिकवाड गावावर शोककळा पसरली आहे.