बेळगाव : सुळगा (हिं.) येथे तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली. कुबेर देमाण्णा दळवी (वय 36, मूळ रा. गस्तोळी दड्डी, ता. खानापूर, सध्या रा. सुळगा (हिं.) असे मृताचे नाव आहे.
याबाबत काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुळगा येथे ओंकार पाटील यांच्याकडून प्लॉट पाडले जात आहेत. या ठिकाणी कामासाठी तिघांना ठेवले असून शेतवडीत शेड उभारून तेथे तिघेजण राहतात. यामध्ये कुबेर हा देखील होता. गुरुवारी रात्री जेवण करून तो शेडच्या बाहेर झोपला होता. यावेळी अज्ञातांनी तेथे जाऊन कुबेरचा गळा दाबून खून केला. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत कुबेर उठला नसल्याने त्याच्या सहकार्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो निपचित पडला होता. त्याच्या जीवाचे बरे-वाईट झाल्याचा संशय आल्याने याबाबत त्यांनी पोलिसांना कळवली.
काकतीचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू असल्याचे निरीक्षक शिंगे यांनी सांगितले.