खडकलाट : निपाणी-मुधोळ महामार्गावरील साततोंडी महालक्ष्मी मंदिराजवळ कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. अजय राजाराम परिट (३०, रा. काडापूर, ता. चिकोडी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पट्टणकुडी येथील महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेसाठी अजय परिट हे दुचाकीवरून (केए २३ एन ३७९५) जात होते. साततोंडी महालक्ष्मी मंदिरासमोर निपाणीकडून भरधाव येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत अजय परिट रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खडकलाट पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसूर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी फरार कारचालकाचा शोध सुरू ठेवला आहे.