बेळगाव : बेळगावात खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या कथित शिवम असोसिएटस् आर्थिक घोटाळा प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. २६) सीआयडीचे विशेष पथक संशयित शिवानंद नीलण्णावरला घेऊन माळमारुती पोलिस ठाण्यात दाखल झाले. तत्पूर्वी, त्याची जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.
या प्रकरणी करवेच्या प्रवीण शेट्टी गटाचे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष यांचीही सीआयडी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. त्यांच्या पत्नीलाही नोटीस बजावली असून त्यांचीही चौकशी होणार आहे. यासह संशयित नीलण्णावर, त्याची पत्नी व अन्य एकाचीही चौकशी झाली आहे. शिवानंदला बुधवारी (दि. २७) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सीआयडीच्या उपाधीक्षकांनी अभिलाष यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांना बंगळूरहून बेळगावात आणण्यात आले. माळमारुती पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी करून त्यांची कारही ताब्यात घेण्यात आली.
बेळगाव विविध ठिकाणी आयोजित केलेले समारंभ, आर्थिक व्यवहार व मुख्य संशयित शिवानंदशी असलेले संबंध याबाबत माहिती घेण्यात आल्याचे समजते. नीलण्णावरने अभिलाषला एक आलिशान सेकंड-हँड मर्सिडीज कार भेट दिल्याची बाब समोर आली आहे. बेळगावात विविध भागांमध्ये आयोजित केलेले समारंभ यशस्वी झाल्यानंतर सुमारे १७ लाख रुपये किमतीची ही कार भेट म्हणून दिल्याचे तपासातून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.