PhD 
बेळगाव

Belgaum PhD Verification : पीएच.डी. लपविणारे ४५२ अतिथी प्राध्यापक रडारवर!

यंदाच्या अर्जात उल्लेखच नाही : शिक्षण विभागाकडून सात दिवसांची मुदत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पीएच.डी. पदवी मिळविण्यासाठी अनेक वर्षांचा अभ्यास आणि संशोधन करावे लागते. मात्र, सरकारी महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापक पदासाठी अर्ज करताना मागील वर्षी पीएच.डी. पदवी असल्याचे जाहीर करणाऱ्या ४५२ उमेदवारांनी यंदाच्या अर्जात या पदवीचा उल्लेखच केला नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अतिथी प्राध्यापक भरती प्रक्रियेतील कथित पीएच.डी. गैरप्रकाराला नवे वळण मिळाले आहे.

काय घडले?

महाविद्यालयीन शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी पदवी महाविद्यालयांमधील अतिथी प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविले होते. यापूर्वी सेवा बजावलेल्या बहुतांश अतिथी प्राध्यापकांनी यंदाही अर्ज केले आहेत. अर्जांची छाननी करताना विभागाच्या निदर्शनास एक महत्त्वाची बाब आली आहे.

२०२५-२६ मध्ये उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात यूजीसीच्या नियमानुसार पीएच.डी. पदवी असल्याचे नमूद केले होते. त्याआधारे त्यांची निवड झाली होती, त्यापैकी ४५२ उमेदवारांनी २०२६-२७ च्या अर्जात पीएच.डी. पदवी असल्याचे नमूद केलेले नाही.

४५२ जणांना नोटीस

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालयीन शिक्षण विभागाने पीएच.डी. पदवीचा दावा न करणाऱ्या ४५२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित उमेदवारांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे आणि लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT