विजापूर : शहरात भरदिवसा गोळीबार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासिन जुबेर (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शहरातील अफजलपूर टक्के परिसरातील रहिवासी यासिन जुबेर पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. पत्नीसमोरच यासिन यांच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या यासिन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह विजापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनास्थळी दोन गोळ्या आढळून आल्या असून हल्लेखोरांनी दोनवेळा फायरिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद गांधी चौक पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.