बेळगाव : यंदा पावसाचे प्रमाण ३० टक्के घटले असून, आतापासूनच नियोजन न केल्यास उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. पूर्ण कर्नाटकातील मोठ्या २३ धरणांपैकी फक्त हिडकल आणि अलमट्टी (लाल बहादुर शास्त्री जलाशय) ही दोनच धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित २१ धरणांमध्ये पाणीसाठी ८० टक्क्यांहून कमी आहे. बेळगाव जिल्ह्यातील नविलुतीर्थ धरण तर फक्त निम्मेच भरले आहे.
राज्यांत १९० तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाने हजेरी लावली असून १०१ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. राज्याची जलाशयांमधील एकूण पाणी साठवण क्षमता ५३५ टीएमसी आहे. मात्र २८ ऑगस्टरोजी या जलाशयांमध्ये एकूण ४०० टीएमसी भरलेले होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
जलाशये प्रामुख्याने कृष्णा खोरे, कावेरी खोरे आणि गोदावरी खोऱ्यात आहेत. कृष्णा खोऱ्यात १७ जलाशयांचा समावेश आहे. इथे बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने ७९ टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूण ४३० टीएमसी क्षमता असणाऱ्या या १७ जलाशयांमध्ये ३४१ टीमएसी पाणीसाठा आहे. कावेरी खोऱ्यात यावर्षी पावसाने दडी मारली आहे. परिणामी धरणात पाणीसाठा अपेक्षित नाही. येथील जलाशये निम्म्याने कोरडी आहेत. जलाशयांमध्ये ५९.६६२ टीएमसी पाणीसाठी आहे. त्यांची क्षमता १०४.५५१ टीएमसी आहे.
राज्यातील बेळगाव आणि बागलकोट हिडकल आणि अलमट्टी ही जलाशये भरली आहेत. महाराष्ट्रात झालेल्या पावसाचा फायदा या दोन्ही जलाशयांना झाला आहे. आलमट्टी धरणात १२२.६५९ टीएमसी पाणीसाठा आहे. क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयही तुडूंब झाले आहे. जलाशयात ५०.८४३ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची पाणी साठवण क्षमता ५१ टीएमसी इतकी आहे. तुंगभद्रा जलाशयात ९६.२२९ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र या जलाशयाची क्षमता १०५ टीएमसी आहे. दरम्यान नवीलुतीर्थ जलाशयात पाणीसाठा कमी आहे. क्षमता ३७ टीएमसी असून केवळ १९.४ टीएमसी पाणीसाठा आहे.
कावेरी खोऱ्यात अवर्षण
कावेरी खोऱ्यात चार प्रमुख जलाशयांचा समावेश आहे. ही जलाशये पावसाअभावी निम्मी कोरडी आहेत. कृष्णराजसागर जलाशयाची क्षमता ४९.५० टीएमसी असून याठिकाणी केवळ ३१.९२ टीएमसी पाणीसाठा आहे. भद्रा जलाशयात ६० टीएमसी पाणीसाठा आहे. क्षमता मात्र ७१.५३ टीएमसी आहे. कृष्णराजसागर, कबिनी, हारंगी, हेमावती जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे.
७१ टक्के क्षेत्रात पेरणी
जलाशयात पाण्याची कमतरता असल्याने सिंचनाला फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात सिंचित क्षेत्र ४६.७५ लाख हेक्टर आहे. कृष्णा, कावेरी आणि तुंगभद्रा नदी खोऱ्यांमधील मोठे आणि मध्यम जलाशयातून संबंधित भागांना सिंचनासाठी पाणी पुरवण्यात येते. राज्यात २१ ऑगस्टपर्यंत ८४.१० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणे अपेक्षित होती. त्यापैकी केवळ ६० लाख हेक्टरमध्ये म्हणजे ७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
पिण्याच्या पाण्याला फटका
केआरएस, तुंगभद्रा, काबिनी आणि अलमट्टी या प्रमुख जलाशयांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठीही केला जातो. ३५ ते ४० टक्के पाणी राखीव ठेवण्यात येते. यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने उन्हाळ्यात पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. केआरएस जलाशयातून बंगळूर, म्हैसूर आणि मंड्या यांसारख्या प्रमुख शहरांना दरवर्षी २४ टीएमसी पाणी पुरवले जाते.
वीज उत्पादनाला फटका
जलाशयातील पाण्याचा उपयोग करुन वीजनिर्मिती करण्यात येते. शरावती खोऱ्यात चार, काळी नदीच्या खोऱ्यात चार, वराही व कावेरी खोऱ्यात प्रत्येकी दोन, आणि कृष्णा व तुंगभद्रा नद्यांवर प्रत्येकी एक वीज प्रकल्प आहे. यातून १० लाख युनिट वीज निर्माण करण्यात येते. २०२४-२५ मध्ये १३,८५३ दशलक्ष युनिट आणि २०२५-२६ मध्ये १५,५०९ दशलक्ष युनिट जलविद्युत निर्मिती करण्यात आली होती. पाण्याच्या कमतरतेमुळे यावर्षी उत्पादन कमी होण्याची भीती आहे.