बेळगाव : शहरातील वृद्धाची 15 कोटी 45 लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण शहर सीईएन पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. यापैकी दोन कोटींची रक्कम हैदराबादमधील दोघांच्या संयुक्त बँक खात्यावर गेल्याने त्या दोघांना सीईएन पोलिसांनी अटक केली. परंतु, त्यांच्या नावे भाडोत्री खाते उघडून त्याचा वापर झाल्याचे समोर आले आहे. साडेपंधरा कोटींची रक्कम 390 खात्यांवर गेली असून ही फसवणूक करणारी 50 जणांची टोळी असून त्याचा शोध घेण्याचे आव्हान सीईएन पोलिसांसमोर आहे.
18 मार्च रोजी टिळकवाडीतील आगरकर रोडवरील 81 वर्षीय वृद्धाच्या खात्यातील तब्बल 15 कोटी 46 लाख रुपये ऑनलाईन भामट्यांनी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिजिटल अरेस्टची भिती दाखवून हा सर्व प्रकार केल्याचे समोर आले होते. ही रक्कम 390 बँक खात्यावर वर्ग झाल्याने पोलिसांनी कसून शोध सुरु केला असता दोन कोटींची रक्कम हैदराबादमधील इंडस इंड बँकेच्या चालू खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे खाते वेंकटदूत ऊर्फ शरत राजू नाईक (रा. गच्चीबोली हॉस्टेल हैदराबाद) व देगावत ऊर्फ श्रीपाद मंगल नाईक (रा. शिवदूर्गनगर चंगीचोर्ला हैदराबाद) या दोघांच्या नावे असल्याचे आढळून आले. या दोघांना तुम्हाला 50 हजार रुपये देण्यासह मासिक काही रक्कम देतो, असे सांगून ही खाती उघडण्यात आली होती.
खात्यावरील दोन कोटींची रक्कम भामट्यांनी आधीच काढून घेतली आहे. परंतु, या दोघांनी आपले बँक खाते दुसऱ्याला वापरण्यासाठी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीईएनचे एसीपी बी. एस. मंटूर, पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी, उपनिरीक्षक सुमन पवार, त्यांचे सहकारी के. व्ही. चरलींगमठ, एन. जे. मादार, व्ही. एन. बडवण्णावर, यासीन नदाफ, एम. ए. हिंडी यांनी ही कारवाई केली.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले असून जनतेत जागृती महत्त्वाची आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जागृती करत असून फसल्यानंतर शहाणे होण्यापेक्षा आधीच सावध राहाल तर तुमची आयुष्यभराची पुंजी सुरक्षित राहील.- बी. एस. मंटूर, एसीपी, सीईएन