बेळगाव : चटईत अडकून १३ वर्षीय मुलाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच मच्छेतील गंगानगर परिसरात बुधवारी (दि. २०) घडली. सुदीप सिद्धाप्पा बिरादार (वय १३, मूळ रा. गुगड्डी, विजापूर, सध्या रा. गंगानगर, मच्छे) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सुदीप घरात चटईवर खेळत होता. यावेळी खेळताना तो चुकून चटईमध्ये अडकला. चटईचा भाग त्याच्या गळ्याभोवती आवळला गेल्याने त्याचा गुदमरुन मृत्यू झाला. घरच्यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यात त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.