विजापूर ः इंडी तालुका समाज कल्याण कार्यालयात कारकून म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका सायबण्णा कन्नोळी (वय 30) यांचा खून करण्यात आला आहे. सकाळी रेणुका इंडी तालुक्यातील कोटनाळ गावातून बसने इंडी शहरात आल्या होत्या. त्या कार्यालयाकडे जात असताना शहरातील टिपू सुलतान चौकात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
गंभीर जखमी झालेल्या रेणुकांना इंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि नंतर पुढील उपचारासाठी विजापूरला हलवले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. इंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.