बेळगाव : बेळगाव-गोकाक मार्गावर मुचंडी गावाजवळ भरधाव वाहनाच्या भीषण धडकेत ४२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे घडली. राजू रामा अष्टेकर (वय ४२, रा. अष्टे-चंदगड, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू बुधवारी पहाटे घरातून बाहेर पडले होते. ते मुचंडीजवळून चालत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
पहाटेची वेळ असल्याने अपघातग्रस्त वाहनचालक वाहनासह फरार झाला. सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने मारीहाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. राजू यांच्या पश्चात एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी मारीहाळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.