बेळगाव : सध्या अधिक मास सुरू असल्याने भाविक विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन देवदर्शनाचा लाभ घेत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्तीतील रेणुकादेवीच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे, यल्लम्मा डोंगर भाविकांनी फुलून जात आहे.
गेल्या आठवडाभरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी रेणुकादेवीचे दर्शन घेतले आहे. विशेषता मंगळवारी आणि शुक्रवारी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, डोंगरावर ‘उदं ग आई उदं’चा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण होताना दिसत आहे. डोंगरावर देवी दर्शनाला येण्यापूर्वी जोगनभावी कुंडावर स्नानासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
यल्लम्मा डोंगराला भेट देणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. शक्ति योजनेंतर्गत बसप्रवास मोफत असल्याने अनेक महिला गटागटाने देवीच्या दर्शनासाठी जात आहेत.