बेळगाव : कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या कुशीत आढळणारा ‘आप्पेमिडी’ हा केवळ एक आंबा नसून दक्षिण भारताच्या जैवविविधतेचा एक अमूल्य वारसा आहे. वैशिष्ट्यपूर्ण तीव्र सुगंध व दीर्घकाळ टिकणाऱ्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगली आंब्याला ‘लोणच्याचा राजा’ ही म्हटले जाते. जागतिक स्तरावर या आंब्याला विशेष मागणी असून याची वार्षिक उलाढाल 80 कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. संशोधक आता याला ‘हेरिटेज’ (वारसा) दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आप्पेमिडी प्रामुख्याने पश्चिम घाटातील घनदाट जंगलांमध्ये आणि नद्यांच्या खोऱ्यात आढळतो. शिर्सी, सिद्धापूर, यल्लापूर, शिमोगा, सागर, होसानगर आणि चिकमगळूर नदी खोरे या आंब्याचे माहेरघर मानले जाते. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, लोंढा, गुंजी, हेम्माडगा आणि कणकुंबी या भागातही आप्पेमिडीच्या काही दुर्मिळ प्रजाती आढळतात. येथील मलप्रभा नदीकाठचे हवामान या आंब्यासाठी अत्यंत पोषक आहे. हा आंबा खाण्यासाठी वापरला जात नाही. कोवळा असतानाच त्याचे लोणचे घातले जाते. पारंपरिक पद्धतीने बनवलेले आप्पेमिडीचे लोणचे 4 ते 5 वर्षांपर्यंत खराब होत नाही. याचा नैसर्गिक सुगंध इतका तीव्र असतो की लोणचे उघडताच संपूर्ण घर दरवळते. एका जुन्या झाडापासून पूर्वी 40 ते 50 हजार आंबे मिळत असत. आता हे प्रमाण 10 ते 12 हजारांवर आले आहे.
कच्च्या फळांची बाजारपेठ 15-20 कोटींची असली तरी लोणचे उद्योगासह ही एकूण उलाढाल 80 कोटी रुपयांहून अधिक आहे. येथील लोणचे यूएई, कुवेत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते. आप्पेमिडीला 2009 मध्ये भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले आहे. यामुळे या आंब्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आणि बनावट उत्पादनांना आळा बसला.
वन विभाग आणि कृषी विद्यापीठांमार्फत आता आप्पेमिडीच्या सर्वोत्तम जातींची कलमे तयार करुन शेतकऱ्यांना दिली जात आहेत. तरीही या नैसर्गिक संपत्तीसमोर सध्या मोठी आव्हाने आहेत. जंगलांचे रुपांतर शेतजमिनीत होत असल्याने जुनी झाडे तोडली जात आहेत. आंबे कोवळे असतानाच तोडल्यामुळे बियाणे जमिनीवर पडत नाहीत.
परिणामी नैसर्गिक पुनरुत्पादन थांबले आहे. अवेळी पाऊस ल पुरामुळे नदीकाठची जुनी झाडे नष्ट होत आहेत. वेळेत कायदेशीर संरक्षण मिळाले आणि नदीकाठच्या भागात संवर्धन क्षेत्र घोषित केले तरच ही दुर्मिळ जात भविष्यातील पिढ्यांसाठी टिकून राहील. बेळगावपासून शिमोग्यापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हे पीक आगामी काळात शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरु शकते.