बेळगाव : शेतीला पाणी देण्यासाठी लावलेले विद्युतपंप व केबल चोरणाऱ्या दोघांना मारीहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ विद्युत पंप व ३०० मीटर लांबीची केबल व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केले. अटक केलेल्या संशयितांमध्ये गुडदप्पा निंगाप्पा तळवार (वय ३६, रा. तुम्मरगुद्दी, ता. बेळगाव) व कल्लाप्पा लक्काप्पा नायक (४२, रा. करीकट्टी, ता. बेळगाव) यांचा समावेश आहे.
तालुक्यातील मारीहाळ ठाणा हद्दीतील हुदली येथील शेतात लावलेले पाच विद्युतपंप चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत झाली होती. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू होता. दि. २२ रोजी दुपारी बाराच्या सुमारास उपरोक्त दोघेजण दुचाकीवरुन विद्युतपंप घेऊन निघाले होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हुदलीसह या परिसराती विद्युतपंप चोरल्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. मारीहाळचे पोलिस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व चंद्रशेखर ए. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.