बेळगाव : तिघा चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या दोन ट्रॅक्टर, ट्रॉली व दोन दुचाकी जप्त केल्या. रायबाग तालुक्यातीर हारुगेरी पोलिसांनी नुकतीच ही कारवाई केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये यल्लाप्पा शिवाप्पा मेटी (वय २५), विलास लक्ष्मण तोगदली (वय २६) व सिद्राम मारुती गोकाक (वय २६, तिघेही रा. मुगळखोड, ता. रायबाग) यांचा समावेश आहे. या संशयितांनी हारुगेरी पोलिस ठाणा हद्दीतील मुगळखोडमध्ये घरासमोर लावलेले ट्रॅक्टर चोरी केले होते.
शिवाय अन्य काही ठिकाणाहून दुचाकीही चोरल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या या वाहनांची किंमत ९ लाख ४० हजार रूपये होते. उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.