बेळगाव : टिळकवाडीतील बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 37 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. त्यात 31 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 318 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 लाख 10 हजारच्या चांदीच्या वस्तू व 40 हजारच्या रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी घरमालक व टीजेएसबी बँकेत व्यवस्थापक असलेले विनायक कल्याण जोशी (रा. साईगणेश अपार्टमेंट, शिवाजी कॉलनी, काँग्रेस विहिरीजवळ टिळकवाडी) यांनी टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोशी कुटुंबीय गावी गेले होते. त्यांचा मुलगा घरात होता. परंतु, तोदेखील कुलूप लावून बाहेर गेला होता. या काळात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरुममध्ये असलेल्या दोन तिजोऱ्या कटावणीने उघडत त्यामधील दागिने व रोख रक्कम पळवून नेली. चोरट्यांनी पळवून नेलेल्या दागिन्यांमध्ये तीन सोनसाखळ्या, एक नेकलेस, तीन ब्रेसलेट, एक चपलाहार, चार पाटल्या, चार बिल्वर, दोन लॉकेट, दोन अंगठ्या व सोन्याच्या बिस्कीटांचा समावेश आहे. हे सर्व दागिने 318 ग्रॅम असून याची किंमत 31 लाख 80 हजार रुपये होते. याशिवाय चोरट्यांनी तीन किलो वजनाच्या 5 लाख 10 हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू नेल्या आहेत. तसेच 40 हजाराची रोकडही चोरुन नेली.
आठवड्यात मोठ्या घरफोड्या
गेल्या आठवड्यात शहापूर परिसरातील भारतनगरमधील बंगला फोडून 80 तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते. आता पुन्हा 37 लाखांची घरफोडी उघडकीस आल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.