बेळगाव : बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे व्यवहाराची नोंदणी केल्याप्रकरणी बेळगाव दक्षिण उपनोंदणी अधिकारी आनंद बदनिकाई यांच्या निलंबनाची शिफारस जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी ही शिफारस नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक आयुक्तांकडे केली असून, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
बागेवाडी महसूल विभागातील अंकलगी गावातील ९ एकर ३३ गुंठे जमिनीच्या विक्री व्यवहाराच्या नोंदणीत घोटाळा झाला आहे. ही जमीन हुबळी येथील रहिवासी दिवंगत दिगंबर कुलकर्णी यांच्या मालकीची होती. अधिकृत नोंदीनुसार त्यांचे सुमारे ३९ वर्षांपूर्वी निधन झाले आहे; मात्र एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या विक्री दस्तावेजात कुलकर्णी स्वतः नोंदणी कार्यालयात उपस्थित राहिल्याचे दाखविण्यात आले आहे.
त्याच मालकाच्या नावावरील अंकलगी गावातीलच आणखी ८ एकर ३७ गुंठे जमीन ५ सप्टेंबर २०२४ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदारांनी संबंधित नोंदणी रद्द करत जमीन पुन्हा दिगंबर कुलकर्णी यांच्या नावावर कायम केली. त्यानंतर रोशन यांनी उपनोंदणी अधिकाऱ्यांवर निलंबनाची शिफारस केली.