बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या संशयिताला वडगाव पोलिसांनी अटक केली. निलेश भरमा सुतार (वय ४१, मूळ रा. भोवी गल्ली, बेळगाव सध्या रा. संभाजी गल्ली, मंडोळी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे सात लाखांचे तर चांदीचे अकरा लाखांचे दागिने जप्त केले.
काही महिन्यांपूर्वी भवानीनगर व मच्छेत घरफोडीची घटना घडली होती. मच्छेतील लक्ष्मी देवलापूर यांच्या घरी तसेच गणेश ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली होती. तसेच भवानीनगर येथेही चोरीची नोंद झाली होती. मच्छे येथील चोरीची नोंद करून घेत पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरु केला होता. त्याला अटक करुन त्याच्याकडून १८ लाखांचे दागिने जप्त केले.
निरीक्षक कट्टीमणीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक संतोष दळवाई यांच्यासह सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, अमित रूपनवर, शिवकुमार कांबळे, तांत्रिक रमेश अक्की, महादेव काशीद, दीपक दोड्डगोणे यांनी ही कारवाई केली.