बेळगाव : बेळगाव शहराला राकसकोप धरणाचे पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अहवाल आला आहे. त्यामुळे चिंता नाही. तरीही गरज भासल्यास टँकरने पाणी पुरवू, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी म्हटले आहे.
बेळगावचा पाणी पुरवठा राकसकोप व हिडकल जलाशयावर अवलंबून आहे. या जलाशयाच्या पाणीपातळीवर आपण जातीने लक्ष ठेवले असून पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी आपण राखून ठेवणार आहे. उर्वरीत पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पुरवले जाईल. राकसकोप जलाशयातील पाणीसाठी जूनपर्यंत पुरणार असल्याची माहिती एलॲण्डटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरात जूनपर्यंत पिण्याचे पाणी पुरणार आहे.
शहरात सध्याा खासगी टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरु आहे. वाजवी दरापेक्षा जास्त पैसे खासगी टँकरने पाणीपुरवठा करणारे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल. सीईओ राहूल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यात ज्या गावात पाणीटंचाई निर्माण होईल त्या गावात ग्राम पंचायतीमार्फत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
126 गावे टंचाईग्रस्त
पुढील महिन्यात 500 ग्राम पंचायतीपैकी 126 ग्राम पंचायतीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याची माहिती तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालच्या माध्यमातून समोर आली आहे. कूपनलिका व विहीरीच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. शिवाय टंच़ाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रोशन यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.