बेळगाव

Belagavi news: पावसाची उघडीप; शेतकऱ्याला धाकधूक

उन्हामुळे पुन्हा उष्म्यात वाढ : पेरणी कामांना ब्रेक, आभाळाकडे डोळे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : केवळ एक दिवस हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणाऱ्या पावसाने पुन्हा दडी मारली आहे. दिवसभर कडक उन्हे पडत असून उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. पावसाने हजेरी लावल्याने सुरू झालेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान खात्याने पावसाला २२ जूनपासून प्रारंभ होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी आनंदित झाला होता. रखडलेल्या पेरणी कामांना प्रारंभ करण्यात आला. मात्र, पावसाची हजेरी केवळ एक दिवसापुरती मर्यादित ठरली. एक दिवसाच्या हजेरीनंतर पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बेळगाव तालुक्यात सध्या पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. धूळवाफ पेरणी केलेली भात पिके उगवून आली आहेत. शेतकरी त्यामध्ये आंतरमशागत करत आहेत. मात्र भात रोप लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर रोपेसाठी तरव्यांची पेरणी केली आहे. त्यांची उगवणही झाली आहे. मात्र वाढीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी विहिरी, कूपनलिकेच्या पाण्याचा वापर करुन फवारणी करत आहेत.

रताळवेली लावण्यास सुरवात

दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांनी रताळ्यांचे वेल लावण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने रताळी लागवडीचे कामकाज ठप्प झाले आहे. लावलेले वेल कोमेजून जात आहेत. पावसाने हजेरी लावल्यास शेतीकामांना गती येणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT