बेळगाव : मूळचे तिबेटचे असलेले आणि सध्या कर्नाटकातील मुंडगोड (जि. कारवार) येथील तिबेटी छावणीत वास्तव्यास असलेले भिक्खू ताशी धोंडुप (वय ३९) यांची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी धारवाड पोलिसांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, सखोल तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत संकेत यादव, वैभव चव्हाण आणि सिद्धेश सुनील भोसले (वय १८, सर्व रा. पिंपळगाव, ता. भुदरगड, कोल्हापूर) यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित दोन संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिक्खूकडे मोठ्या प्रमाणात पैसे असावेत या संशयातून संशयितांनी त्यांचे अपहरण केले. अपहरणानंतर गाडीतच त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, भिक्खूकडे पैसे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितांनी त्यांना बेदम मारहाण करून ठार केले.
हत्या केल्यानंतर मृतदेह हल्याळ रोडवरील खालच्या पुलाजवळ फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी धारवाड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्हा पोलीसप्रमुख गुंजन आर्य यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आठ स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांचा तपास करताना अडचणी निर्माण झाल्या. वापरलेल्या वाहनावर नंबरप्लेट नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, मृतदेह फेकून देण्यापूर्वी संशयितांनी एलपीजी भरण्यासाठी वाहन एका पंपावर थांबले होते. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत संकेत यादव, वैभव चव्हाण आणि सिद्धेश भोसले यांना अटक केली. या हत्येसाठी वापरण्यात आलेले काही साहित्य अद्याप हाती लागले नाही. तसेच या प्रकरणातील दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांचे कार्य कौतुकास्पद
कारला वाहन क्रमांक नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती; मात्र धारवाड पोलिसांनी केवळ एलपीजी गॅस भरताना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरून या संशयित आरोपींचा माग काढला. धारवाड पोलिसांचे तपास कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख गुंजन आर्य यांनी पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.