बेळगाव

Karnataka Politics: आगामी दोन वर्षे आकांक्षापूर्तीची

त्रिवर्षपूर्ती मेळाव्यात काँग्रेसचा निर्धार; गत तीन वर्षे अपेक्षापूर्तीची

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सत्ताधारी काँग्रेस सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या असून उर्वरित दोन वर्षांच्या काळात आकांक्षाही पूर्ण करू. त्या आकांक्षापूर्तीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेवर येऊ, असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला. निमित्त होते काँग्रेस सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचे.

तुमकूर येथे मंगळवारी साधना मेळावा झाला. ‘जनतेच्या सेवेसाठी समर्पित’ असे नामकरण केलेल्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी समर्थकांना संबोधित केले. मेळाव्याचे उद्‌घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेन्शन, घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना हक्कपत्रांचे वाटप झाले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या ५८० आश्वासनांपैकी २९० आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात प्रलंबित आश्वासनेही पूर्ण केली जातील. त्यामुळे आतापर्यंतची तीन वर्षे जनतेच्या अपेक्षापूर्तीची होती. पुढची दोन वर्षे जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची असतील.

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून आम्ही एकेक करून जाहीर केलेल्या पाच हमींची पूर्तता केली आहेच; सोबतच उर्वरित आश्वासनेदेखील पूर्ण करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्व जाती-धर्मांच्या जनतेच्या विकासासाठी काम केले आहे. गरिबांना सक्षम करण्यासाठी काम केले आहे. भाजपप्रमाणे आम्ही जात व धर्माच्या नावाखाली नागरिकांना विभाजित करण्याचे राजकारण केले नाही.

गुजरातमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मात्र तिथे कोणताही विकास झालेला नाही. गुजरातमध्ये अलीकडेच घरचे केवळ 2 हजार 500 रुपयाचे भाडे एका कुटुंबाला देता न आल्याने या गरीब कुटुंबाच्या १३ वर्षांच्या मुलीवर घरमालकाने बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेच का गुजरात मॉडेल, असा सवालही डॉ. परमेश्र्वर यांनी केला. कर्नाटकचे उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल. संविधानानुसार देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ, असे आश्वासनही काँग्रेस नेत्यांनी दिले.

नीटसाठी मोदी सरकार जबाबदार

नीट रद्द करून २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला गेला आहे. मोदी सरकार अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहे. राज्याच्या सीईटी मॉडेलवर परीक्षा घेण्याची आमची सूचना त्यांनी फेटाळून लावली, अशी टीकाही काँग्रेस नेत्यांनी केली.

भाजपवर टीका

मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. काळा पैसा बाहेर काढला नाही. त्यामुळे भाजप-आरएसएस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशाचे कर्ज २२० लाख कोटींपर्यंत वाढवले, अशी टीकाही नेत्यांनी केली.

व्यासपीठावर कायदामंत्री एच. के. पाटील, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद, मुख्य प्रतोद अशोक पट्टण, आहारमंत्री के. एच. मुनियप्पा, उच्च शिक्षणमंत्री डी. सुधाकर, महसूलमंत्री कृष्णा ब्यायरेगौडा, वनमंत्री ईश्वर खांड्रे यांच्यासह सर्व मंत्री आणि ज्येष्ठ आमदार उपस्थित होते. मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी यांची गर्दी होती. १ लाख ५२ हजार लाभार्थ्यांना घरकुलांची हक्कपत्रे, पेन्शनसह इतर योजनांची प्रमाणपत्रे तसेच नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली. काही प्रमाणपत्रे प्रत्यक्ष हस्तांतरित करण्यात आली. तर काही प्रमाणपत्रे थेट ऑनलाईन देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT