राजेश शेडगे
निपाणी ः शहराचा उपनगरीय भाग असलेल्या गायत्रीनगर व प्रगतीनगरातील उद्यानांकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी या उद्यानांची दूरवस्था झाली असून अस्वच्छतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील वर्दळही घटली आहे. पालिका प्रशासनाने याचा विचार करुन तातडीने या उद्यानांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरात मोजकीच उद्याने आहेत. त्यापैकी एक गायत्री उद्यान आहे. परंतु, तेदेखील देखभालीअभावी विकासापासून वंचित आहे. गायत्रीनगर उद्यानात रात्रीचा अंधार पसरला असून सर्व दिवे बंद आहेत. पाण्याअभावी झाडेझुडपे वाळून गेली आहेत. येथे नगरपालिकेने कायमस्वरूपी माळी नेमलेला नाही. त्यामुळे, या उद्यानात दैनंदिन स्वच्छता होत नाही. परिसरातील लोक व लहान मुले विरंगुळ्यासाठी या उद्यानात येतात. परंतु, मुलांना खेळण्यांची मोडतोड झाली आहे. नगरपालिकेने या उद्यानाच्या सुशोभीकरणासह मुलांना खेळणी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली आहे.
प्रगतीनगर उद्यानात असलेल्या सागवान झाडांमुळे अस्वच्छतेत भर पडली आहे. सातत्याने पानगळ होत असल्याने उद्यानात पुरेशी स्वच्छता दिसत नाही. येथे मुलांना खेळण्यासाठी खेळणी व लोकांसाठी जिमचे साहित्य आहे. परंतु, स्वच्छता नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. निसर्ग मित्र मंडळाकडून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातो. नगरपालिकेने येथे स्वतंत्र माळी नियुक्त करून नवीन रोपे लावावीत. उद्यानाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी अविनाश पाटील, जोतिबा पाटील, डॉ. अमृत पाटील यांनी केली आहे.