बेळगाव

Belgaum News: अळंबी खाल्ल्याने ९ जण अत्‍यवस्‍थ

चिकोडी तालुक्यातील उमराणीतील घटना गर्भवतीचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

​चिकोडी : शेतात उगवलेली अळंबी (मशरूम) खाल्ल्याने दोन कुटुंबातील नऊजण अत्‍यवस्‍थ झाले. यामध्‍ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. सदर चिकोडी तालुक्यातील उमराणी गावात घडली.

अत्‍यवस्‍थ सदस्‍य जिद्दीमणी आणि कोळी कुटुंबातील असल्याचे समोर आले असून त्‍यांच्‍यावर चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ​जिद्दीमणी आणि कोळी कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे शेतातील काम संपवून घरी परतत असताना त्यांना उगवलेली अळंबी (मशरूम) दिसली. त्यांनी घरी आणली. एका कुटुंबाने अळंबी आणल्याचे पाहून दुसऱ्या कुटुंबानेही त्यांच्याकडून थोडी अळंबी घेउन त्याची भाजी बनवली.

परंतु, संबंधित शेतमालकाने काही दिवसांपूर्वीच शेतातील पिकांवर कीटकनाशकाची फवारणी केली होती. ही बाब माहीत नसल्याने दोन्ही कुटुंबांनी कीटकनाशकाचा अंश असलेल्या अळंबीची भाजी बनवून खाल्ली.

​जेवण झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. घरातील सर्वच जण तीव्र वेदनेने विव्हळू लागल्याने स्थानिकांच्या मदतीने तातडीने नऊजणांना चिकोडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्‍ये एका गर्भवती महिलेचा समावेश असून तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अत्‍यवस्‍थांवर वेळेवर उपचार झाल्‍यामुळे सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT