बेळगाव : गावठी पिस्तुली तयार करून ती विकणाऱ्या कारागीरासह खरेदी करणाऱ्यांना आणि पिस्तूल बनवण्याचे सुटे भाग विक्रीसाठी ठेवणाऱ्या पुस्तत विक्रेत्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ पिस्तुली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांमध्ये बेळगाव शहर, मार्कंडेयनगर, काळेनट्टी, देसूरसह रामनगरमधील रहिवाशांचा समावेश आहे.
बेकायदेशीर गावठी पिस्तूल तयार करून देणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने नऊ जणांना गावठी पिस्तूल विकल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यासह खरेदीदार, पिस्तूल बनवण्यासाठी साहित्य व आगाऊ रक्कम देणारा व अन्य काहीजण अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला. या सर्वांवर गुन्हा दाखल करून पिस्तूल जप्त केली आहेत. इंडियन आर्म्स ॲक्टअंतर्गत सर्वांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काटगाळी येथे एकजण गावठी पिस्तूल तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी संशयावरून मारुती श्रीकांत सुतार (वय ५९, रा. काटगाळी, ता. खानापूर) याला ११ मेरोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देताना आपण गावठी पिस्तूल तयार करून कोणाला विकली ही माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून आठ जणांनी पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
यामध्ये सोमनाथ प्रल्हाद चौगुले, संतोष शिवाजी नायक, मारुती यल्लाप्पा गुडद्यागोळ, बाळू भरमाणी नायक, लक्ष्मण बाळप्पा गुजनाळ, (सर्वजण रा. मार्कंडेयनगर, बेळगाव), बसवराज गंगाप्पा सालोटगी, बसवंत भरमाणी यरमाळकर व लक्ष्मण ईश्वर गुरव (तिघेही रा. मोदेकोप्प) यांचा समावेश आहे. याशिवाय मरीयप्पा निंगाप्पा नायक (रा. काळेनट्टी, ता. बेळगाव) याने पिस्तूल बनवण्यासाठी आगाऊ रक्कम दिल्याने त्यालाही अटक झाली आहे.
पिस्तूल तयार करण्यासाठी विश्वनाथ ऊर्फ संतोष सीताराम देसाई (रा. रामनगर, ता. जोयडा) हा बुकस्टॉल चालक बंदूक तयार करण्यासाठी लागणारे काही सुटे भाग विक्रीसाठी ठेवत होता. त्याच्याकडून मारुती सुटे भाग खरेदी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यालाही अटक करून त्याच्याकडून २१ ट्रिगर, पाच गड्डा अर्थात पुढील भाग, १५ निपल, एक सिलींग बेल्ट, ४४९ काडतूस, ४२० कॅप, ४८ जिवंत काडतूस व अन्य साहित्य जप्त केले. बैलहोंगल उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे निरीक्षक एच. एल. गवंडी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.