बेळगाव : भारत हा १५ वर्षांपासून पोलिओमुक्त देश म्हणून ओळखला जातो. परंतु, अलीकडच्या काळात भारताच्या शेजारील देशांमध्ये पोलिओची प्रकरणे आढळल्याने देशात लसीकरण अभियान कायम ठेवण्यात आले आहे. त्यानुसार उद्या रविवारी २८ जूनरोजी जिल्ह्यातील पावणे पाच लाख बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
देश पोलिओमुक्त कायम राखण्यासाठी आणि शेजारील देशांमधून भारतात पोलिओचा संसर्ग पसरू नये याची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ४ लाख ७१ हजार ४१ बालकांना लस देण्यात येणार असून यासाठी ९,५१४ कर्मचारी तर ६१८ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अभियानाच्या पहिल्या दिवशी २८ रोजी, स्थलांतरित समुदाय आणि शहरी झोपडपट्ट्यांमधील मुलांना विशेष प्राधान्य देऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर हे अभियान तीन दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे. एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या एकाच फेरीत प्रत्येक मुलाला पोलिओ लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालये आणि अंगणवाड्या, डोंगराळ भाग, वीटभट्ट्या, बांधकाम क्षेत्रे, स्थलांतरित वस्त्या, शेतघरे, शहरे, शहरी रेल्वे स्थानके, विमानतळे आणि झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर सर्व विभागांची समन्वय बैठक आयोजित करून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.