निपाणी : शहरातील बेळगाव नाका ते ईदगाह माळ पर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते. याबाबतचे वृत्त दै. पुढारीने 8 जानेवारीला सचित्र प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने केबल दुरुस्ती करून हे बुधवार दि. 14 पासून पथदीप सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पथदीप बंद होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व पादचाऱ्यांंना अंधारातून वाट काढावी लागत होती. राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने यरनाळ, शिरगुप्पी, शेंडूर, बुदलमुख, पांगिर बी, बिरदेवनगर, पंतनगर तहसीलदार प्लॉट, बडमंजी प्लॉट, डॉलर कॉलनी लेटेस्ट कॉलनी भागातील नागरिकांना गांधी हॉस्पिटलमार्गे ईदगाह माळवरून शहरात ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरील वाहतूक वाढली असल्याने पथदीप लावणे गरजेचे झाले होते. याकडे निपाणी नगरपालिकेने लक्ष दिल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव नाक्यापासून शहरातील बस स्थानकापर्यंतचे पथदीप सुरू होते. परंतु बेळगाव नाका ते ईदगाह माळपर्यंतचे पथदीप गेल्या अनेक महिन्यापासून बंद होते. नगरपालिकेच्या 6 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या मार्गावरील पथदीप सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. त्यासाठी निधीची तरतूददेखील करण्यात आली होती. दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेऊन हे पथदीप सुरू केल्याने आता हा मार्ग दिव्यांनी उजळला आहे. माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी ‘पुढारी’च्या वृत्तामुळे पथदीप सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.