बेळगाव : अनगोळ रोडवरील अतिक्रमण हटविताना कायदा बासनात गुंडाळून ठेवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना जाब विचारला. त्यावेळी आयुक्तांनी कारवाई करताना चूक झाली असे मान्य करुन यापुढे रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेत गुरुवारी (दि. २) आयुक्त कार्तिक एम. यांच्या कक्षात अधिकारी आणि व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने ॲड. एन. आर. लातूर आणि सुजित मुळगुंद यांनी बाजू मांडली. अनगोळ रोडवरील अतिक्रमण हटवत असताना महापालिकेने कायद्याचे उल्लंघन केले आहे. व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारे नोटीस न देता मनमानी कारवाई करून व्यापाऱ्यांचे नुकसान केले आहे. लोकांवर दादागिरी करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला.
कायद्यावर बोट ठेवून आयुक्तांना जाब विचारल्यामुळे अखेर आयुक्त कार्तिक यांनी आपली चूक मान्य केली. त्यांनी त्याठिकाणी रहदारीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने आणि आहाराचे स्टॉल शाळेजवळ न लावण्याची सूचना केली. वेंडिंग झोनबाबत आणि कायद्याबाबत जागृती करण्यात येईल असे सांगितले. यावेळी व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष रेखा लक्कुंडी, सरचिटणीस तनू, महापालिका प्रशासन विभागाचे उपायुक्त उदयकुमार तळवार, महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.