बेळगाव : जूनमध्ये मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला असून भाजीपाला आणि फळबागांची लागवड संकटात सापडली आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६६,७५० हेक्टर बागायत क्षेत्रापैकी तब्बल ४०,००० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट होते. मात्र, जूनअखेरपर्यंत केवळ ४,३०० हेक्टरवरच (१० टक्के) पेरणी पूर्ण होऊ शकली आहे.
जिल्ह्यात सरासरी ३०० मिमी पावसाची गरज असताना सध्या अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यातच कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे लागवड केलेली पिके सुकू लागली आहेत. बेळगाव जिल्हा हा राज्यातील भाजीपाला उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा मानला जातो. येथे प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, बटाटा, हरभरा, कोबी, फ्लॉवर, गाजर यांसारखी पिके घेतली जातात. याशिवाय केळी, आंबा, काजू, नारळ आणि सुपारी यांसारख्या फळबागांचेही मोठे क्षेत्र येथे आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे यंदा भाजीपाला लागवडीला मोठी खीळ बसली आहे. सद्यस्थितीत केवळ २० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून पुढील ८ ते १० दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास परिस्थिती अत्यंत बिकट होईल, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी आटल्यामुळे आता शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवावी लागत आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर लागवडीचा खर्चही निघणे कठीण होईल आणि बाजारात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडतील, असा तर्क वर्तवला जात आहे. कृषी व फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मार्गदर्शन व विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत.