बेळगाव

Belgaum blackmail case: सातजणांची फसवणूक, तरी ‘ती मी नव्हेच!’

लग्नाळू तरुणांना अन्‌ पोलिसांनाही ब्लॅकमेल : पोलिसांनी आवळल्या ‘लखुबाई’ लोखंडेच्या मुसक्या!

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मॅट्रिमोनियल साईटद्वारे एखाद्या तरुणाशी संवाद साधायचा... तू मला आवडलास, मी लग्नाला तयार आहे, असे सांगत त्याच्याशी व्हाट्सॲप चॅटिंग करायचे. तो बघून गेला अन्‌ तिला नकार दिला तरी त्याने माझ्याशी लग्न करून पळून गेला व जाताना आपले पैसे व सोने नेल्याची फिर्याद द्यायची...अशा पद्धतीने ७ जणांना फसवणाऱ्या लखुबाई लोखंडे अर्थात रेश्मा शंकर मुतगार (वय ३५, मूळ रा. घटप्रभा सध्या रा. गणेशपूर बेळगाव) या तरुणीला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाची रंजक माहिती अशी की, रेश्मा ही मूळची घटप्रभा येथील असून काही महिन्यांपासून ती गणेशपूर येथे राहते. ती मॅट्रिमोनियल साईटवर एखाद्या सुंदर तरुणीचे छायाचित्र घालून स्वतःचे नाव नोंदवते. अशाच पद्धतीने तिने काही महिन्यांपूर्वी तुमकूर येथील कल्याण मल्लिकार्जुन यरकुल याच्याशी तिने संपर्क साधला. त्याला तू मला आवडला आहेस, लग्न करूया, असे म्हणत काही दिवस चॅटिंग केले. त्यानंतर तिने १ मे रोजी थेट घटप्रभा पोलिस ठाणे गाठले. कल्याण हा २६ मार्च रोजी आपल्याला पहायला गणेशपूरला त्याच्या आई-वडिलांसोबत आला. त्याचा आणि माझा त्याच दिवशी विवाह झाला. आपल्यासोबत एक रात्र राहून तो ८ लाख रूपये व दागिने व मोबाईल घेऊन पळून गेला, अशी फिर्याद तिने दिली.

तपशील काढताच नरमाई

७ मे रोजी रेश्मा पुन्हा आली असता घटप्रभा ठाण्याचे निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी लग्नाचे पुरावे मागितले. यावेळी रेश्माने आपले आई-वडील, भटजी व अन्य काही जणांची नावे दिली. पोलिसांनी या सगळ्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन कथित लग्न झालेल्या दिवशी ते कुठे होते, या नोंदी शोधल्या. तर त्या दिवशी गणेशपूरला कोणीच नव्हते.

दुसऱ्या दिवशी ८ मे रोजी पुन्हा रेश्माने पुन्हा दोन वकीलांना सोबत आणत ठाण्यात धिंगाणा घातला. तेव्हा निरीक्षक मुल्ला यांनी एफआयआर नोंदवतो आणि सर्व क्रमांकाचे कॉल डिटेल्स्‌ काढून बघतो, असे म्हणताच ती नरमली. कॉल डिटेल्स्‌ नको व एफआयआरही नको, फक्त त्याने नेलेले पैसे द्यायला सांगा, असे म्हणत रेश्माने काढता पाय घेतला.

लग्न न झाल्याचा दावा

पोलिसांनी फिर्याद घेऊन कल्याणला फोन लावला असता त्याने रेश्माला लग्नालाठी बघायला आल्याची कबुली दिली. परंतु, तिने वेबसाईटवर लावलेला फोटो व प्रत्यक्षात ती दिसायला वेगळी असल्याने नकार देऊन आम्ही परत आलो, असे सांगितले. परंतु, रेश्माने लग्नपत्रिका दाखवत लग्न झाल्याचा हेका न सोडता पोलिसांवर दबाव आणला. शिवाय त्याने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉटही दाखवले. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कल्याणला पाचारण केले. तो ७ मे रोजी घटप्रभा ठाण्यात हजर झाला.

अशी करत होती व्हॉटस्ॲप चॅटचे स्क्रीनशॉट

रेश्माने कल्याणच्या नावाने आलेले संदेश दाखवून पोलिस निरीक्षकांना कोड्यात टाकले. नंतर त्यापुढे जाऊन तिने घटप्रभा ठाण्याचे निरीक्षक व तेथील कॉन्स्टेबलही ६ लाख रू. मागत असल्याचे चॅटिंग स्क्रीनशॉट थेट एसपींना पाठवून सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये एक नियमित व दुसरे बिझनेस अशी दोन व्हॉटस्ॲप अकाऊंट होती, हे उघडकीस आले. रेश्मा आधी संबंधिताचा मोबाईल क्रमांक बिझनेस व्हॉट्सॲपवर सेव्ह करायची. त्यानंतर आपल्या क्रमांकावरून मला न्याय द्या, अशा मेसेज करायची व सेव्ह केलेल्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून सहा लाख दिल्याशिवाय काम करणार नाही, असा स्वतःच दुसरा मेसज करायची व स्क्रीनशॉट घ्यायची, असा प्रकार तिने केल्याचे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT