बेळगाव : बेळगाव शहरात दोन तसेच कोल्हापूर येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १६९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त केले. याची किंमत २५ लाख ३५ हजार रूपये होते. विशेष म्हणजे ज्या तीन घरांमध्ये चोरी झाली आहे, ते सर्व या चोरट्यांचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्पाक खाजासाब साठी (वय ४२, रा. कसाई गल्ली, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
सदर चोरट्याने शहरातील अमननगर व न्यू गांधीनगर परिसरातील दोन बंद घरे फोडून चोरी केली होती. ज्यांच्या घरी चोरी झाली ते या चोरट्याचे नातेवाईक आहेत. काहीतरी काम काढून नातेवाईकाच्या घरी जायचे, त्यांनी कुठे रक्कम व दागिने ठेवले आहेत, याचा आधी अंदाज घ्यायचा. त्यानंतर ते कधी कोणत्या गावी अथवा समारंभाला जातात, याची माहिती घेऊन ते घर फोडायचे, असा प्रकार त्याच्याकडून सुरू होता. त्यामुळे त्याला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.
परंतु, माळमारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, उपनिरीक्षक श्रीशैल हुळीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा यशस्वी शोध घेतला आहे. याकामी त्यांना उपनिरीक्षक उदय पाटील, बसवराज बस्तवाड, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, बी. एम. कल्लप्पन्नवर, सी. जे. जिन्नाप्पगोळ, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, महेश ओडेयर, मल्लिकार्जुन गाडवी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद, दिपक दोडगोनी यांचे सहकार्य लाभले.