बेळगाव : पत्नी माहेरी गेल्याने मानसिक तणावात असलेल्या एका युवकाने विष पिऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि. ७) काकतीत (ता. बेळगाव) उघडकीस आली आहे. सागर गुंडू परमोजी (वय ३५, रा. मारुती गल्ली, काकती, ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती, सागर याचा पत्नी संजना हिच्याशी काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ती दोन महिन्यांपूर्वी माहेरी राहण्यासाठी गेली होती. पत्नी दूर गेल्याने सागर मानसिकदृष्ट्या खचला होता. शनिवारी रात्रीपासून तो नैराश्यात होता. रविवारी सकाळी घरच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन त्याने दरवाजा बंद केला. त्यानंतर विषप्राशन केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांना ही घटना उशिराने समजली. या घटनेची माहिती काकती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.