बेळगाव : एकेकाळी 'पेन्शनर्स पॅराडाईज' आणि थंड हवेसाठी ओळखले जाणारे बेळगाव शहर आता वाढत्या उष्णतेच्या विळख्यात सापडले आहे. १९७० च्या दशकातील हिरवेगार बेळगाव आणि आजचे शहरीकरण झालेले बेळगाव यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडल्याची खंत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दशकांत बेळगावमधील वृक्षसंपदा झपाट्याने कमी झाली आहे. एकेकाळी झाडांनी डवरलेल्या या शहरात आता केवळ ३० टक्के झाडे उरली आहेत. याचा थेट परिणाम शहराच्या तापमानावर झाला असून पूर्वी जे तापमान ३३ ते ३५ अंश असायचे, ते आता ३७ ते ३८ अंशांपर्यंत पोचले आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे शहराची नैसर्गिक 'कुलिंग सिस्टीम' बिघडली आहे. पूर्वी उन्हाळ्यातही बेळगावमध्ये रात्रीच्या वेळी हवेत छान गारवा असायचा.
परंतु, आता रात्रीही उष्णता जाणवत असल्याने लोक हैराण झाले आहेत. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांपासून अनेक संस्था आणि पर्यावरणप्रेमी बेळगावला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, झालेली हानी भरून काढण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. बेळगावला पुन्हा एकदा 'ग्रीन बेळगाव' बनवण्यासाठी आता लोकसहभागाची गरज आहे. लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन रोपलागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हरित भविष्यासाठी 'ग्रीन सेविअर्स'चे आवाहनवाढते जागतिक तापमान आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बेळगावमध्ये 'ग्रीन सेविअर्स' संस्थेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. 'हरित आणि आरोग्यदायी बेळगाव' घडवण्यासाठी संस्थेने एक सर्वसमावेशक कृती आराखडा जाहीर केला असून, यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.
'ग्रीन सेविअर्स'ने आता शहराला अधिक शाश्वत बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. जागतिक तापमानवाढ ही नियंत्रणाबाहेरची समस्या वाटत असली, तरी एकत्रित प्रयत्नांतून स्थानिक हवामानावर सकारात्मक परिणाम घडवून आणणे शक्य आहे, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. शहराच्या या पर्यावरणपूरक मोहिमेत केवळ व्यक्तीच नव्हे, तर सामाजिक संस्था आणि गट, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापने आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आली आहे.