Love Pudhari
बेळगाव

Love scam: प्रेमाचे नाटक, प्रेयसीच्या पैशांची चटक, युवकाला अटक

तरुणीची फसवणूक करणाऱ्याला जेलची हवा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक करणाऱ्या तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाला अखेर पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मात्र शहापूर पोलिसांनी आधी तक्रार घेण्यास नकार दिल्यामुळे फसलेल्या युवतीला पोलिस आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली.

ईश्वरसिंग प्रेमसिंग बडगुजर (वय 32, रा. महाद्वार रोड, बेळगाव) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पीडित तरुणीशी सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर ईश्वरने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 2019 पासून त्यांची मैत्री होती. त्यानंतर तिचा विश्वास जिंकत ईश्वरने 16 तोळे सोने आणि टप्प्याटप्प्याने 9 लाख रुपये तिच्याकडून मागून घेतले. शिवाय त्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओही बनवले.

काही दिवसांपूर्वी तरुणीने ईश्वरला लग्नाबद्दल विचारले असता, त्याने नकार दिला. त्यामुळे तरुणीने शहापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. तथापि, शहापूर पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता तरुणीलाच समेट करण्याचा सल्ला दिला. शनिवारी शहापूर पोलिस ठाण्यात गेलेल्या युवतीला पोलिसांनी सहकार्य न करता ईश्वरशी समेट करण्याचा सल्ला दिला. ईश्वरने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. याचबरोबर तो ब्लॅकमेलिंग करत असून त्याने पैसे व सोने घेतल्याची तक्रार देऊनही शहापूर पोलिसांनी दखल न घेतल्याने पीडितेने पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे धाव घेतली.

त्यानंतर पोलिस आयुक्तांनी शहापूर पोलिसांची चांगलीच झाडाझडती घेतली. रविवारी रात्री उशिराने शहापूर पोलिसांनी त्या युवकावर गुन्हा दाखल केला. सोमवारी ईश्वरला अटक झाली. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला हिंडलगा कारागृहात पाठवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT