बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खासगी जागेतून तलावाची दुसरी संरक्षक भिंत मंगळवारी (दि. ४) सकाळी कोसळली. त्यामुळे बाजूच्या दोन घरांना आणि एका गोठ्याच्या बांधकामाला तडे गेले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने ही घरे सील केली आणि कुटुंबीयांना पर्यायी ठिकाणी जाण्याची सूचना केली.
कपिलेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावाची संरक्षक भिंत कोसळून सोमवारी (दि. ३) दोन मुले बुडाली. यामध्ये शिवम सुंडीकर या सात वर्षीय मुलाचा मृतदेह लवकर मिळाला तर परशुराम निलजकर या ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह रात्री उशिरा मिळाला.
वारंवार घटना घडत असल्यामुळे लोकांनी महापालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला होता. धोकादायक जागा असतानाही त्या ठिकाणी बंदी का घालण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला होता. सोमवारी सकाळी त्याच तलावाची दुसरी संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण बाजूला असलेल्या दोन घरांच्या इमारतीला आणि एकाच गोठ्याच्या बांधकामाला तडे गेले आहेत. त्यामुळे ही जागा सुद्धा धोकादायक बनली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज या घटनेची पाहणी केली.
त्यांनी दोन घरात असलेल्या कुटुंबीयांना भाडोत्री राहण्याचा सल्ला दिला. घरातील सर्वसाहित्य काढून घेऊन दुसरीकडे राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर या घरांना सील केले. शिवाय तलावाच्या चारही बाजूने बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद केला. दुसऱ्या बाजूची भिंत कोसळल्यामुळे या परिसरात लोकांची गर्दी झाली होती.