बेळगाव

Belgaum Accident: कित्तूरजवळ सिमेंट खांबवाहू टेम्पो उलटून ३ ठार

चालकासह तिघेजण जखमी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शिमोग्याहून बेळगावला सिमेंटचे खांब भरून येणाऱ्या मिनी टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेंपो उलटून त्याखाली दबून तिघे कामगार ठार झाले, तर चालकासह तिघेजण जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कित्तूर येथील चन्न्मा सर्कलजवळ हा अपघात घडला. तिघेही कामगार टेम्पोच्या हौद्यातील सिमेंटच्या खांबांवर बसले होते.

टेम्पोचालक दुर्गाप्पा मारुती गाडीवड्डर (रा. चडचण, जि. विजापूर) हा संरक्षक भिंतीसाठी वापरले जाणारे सिमेंटचे खांब टेम्पोमध्ये भरून शिमोगाहून बेळगावला येत होता. टेम्पोत काही कामगार तसेच प्रवासीही बसलेले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास वाहन कित्तूरजवळील पुलावर आले असता दुभाजकाचा अंदाज चालकाला न आल्याने टेम्पो दुभाजकावर चढला अन्‌ उलटला. मागे बसलेल्या कामगारांच्या अंगावर खांब पडल्याने तिघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. टेम्पोचालक दुर्गाप्पा हा देखील जखमी झाला.

मृतांमध्ये पवनकुमार भोलानाथ (वय २७), आदिअली शौकतअली (वय २४) व नजीर वसीम (वय १९, तिघेही रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. याशिवाय टेम्पोतील सौरभ रामलखन व शिवकुमार विरेंद्रकुमार (दोघे रा. उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह चालकावर उपचार सुरू आहेत. मालवाहू वाहनात प्रवासी भरणे व निष्काळजीपणाने अपघात घडवल्याचा ठपका ठेवत चालक दुर्गाप्पा याच्यावर कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT